लष्कर-ए-तोयबाचा (LeT) उपप्रमुख आणि 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांमागील मुख्य सूत्रधार अब्दुल रहमान मक्की यांचे पाकिस्तानच्या लाहोर येथे निधन झाले. मक्की यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यांना लाहोरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे शुक्रवारी त्यांचे निधन झाले.
मक्की हे मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद यांचे मेहुणे होते. जानेवारी 2023 मध्ये, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं (UNSC) मक्की यांना 1267 अल-कायदा प्रतिबंधक समितीच्या अंतर्गत दहशतवादी घोषित केले होते. या निर्णयामुळे मक्की यांची मालमत्ता गोठवणे, प्रवासबंदी आणि शस्त्रास्त्रांवरील बंदी लागू करण्यात आली होती.
भारताने अनेक वर्षे मक्की यांच्या नावाचा समावेश या प्रतिबंधक यादीत करण्याचा आग्रह धरला होता, परंतु चीनच्या व्हेटोमुळे हे प्रयत्न वारंवार अयशस्वी ठरले. मात्र, 2022 मध्ये अमेरिकेच्या मदतीने भारताने मक्की यांना दहशतवादी म्हणून घोषित करण्यामध्ये यश मिळवले.
लष्कर-ए-तोयबाच्या वरिष्ठ सदस्य म्हणून मक्की यांनी गटाचे राजकीय व्यवहार पाहिले आणि निधी गोळा करण्याच्या कारवायांमध्ये सहभाग घेतला. त्यांचा अनेक दहशतवादी कारवायांशी संबंध होता. अमेरिकेने त्यांच्यावर 2 दशलक्ष डॉलरचे बक्षीस जाहीर केले होते आणि त्यांना दहशतवादी घोषित केले होते. 2020 मध्ये, पाकिस्तानमधील एका न्यायालयाने त्यांना दहशतवादाला निधी पुरवण्याच्या प्रकरणात दोषी ठरवले आणि तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.