दिल्लीमध्ये सोमवारी नामांकित शिक्षणतज्ज्ञ आणि मोटिवेशनल स्पीकर अवध ओझा यांनी आम आदमी पक्षात (आप) प्रवेश केला. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि वरिष्ठ नेते मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत ओझा यांनी आपमध्ये सामील होण्याची घोषणा केली. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी प्रसिद्ध असलेल्या ओझा यांनी शिक्षण सुधारण्यासाठी राजकारण हा एक प्रभावी मंच ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
ओझा यांनी केजरीवाल आणि सिसोदिया यांचे आभार मानत पक्षात सामील होण्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी शिक्षणाविषयीची आपली बांधिलकी अधोरेखित करत सांगितले, “शिक्षण हे कुटुंब, समाज आणि राष्ट्राचे आत्मस्वरूप घडवण्याचे साधन आहे. जगातील सर्व महान नेत्यांनी आणि राष्ट्रांनी शिक्षणाला प्राथमिकता दिली आहे. आज मी राजकारणात पदार्पण करत असताना, शिक्षणाला प्राधान्य देण्याची माझी प्रतिज्ञा पुन्हा अधोरेखित करतो. राजकारण आणि शिक्षण यांपैकी कधी निवड करायची वेळ आली तर मी नेहमीच शिक्षणाची निवड करेन.”
मिळालेल्या माहितीनुसार, अवध ओझा यांचे नाव यापूर्वी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याच्या चर्चेत होते. मात्र, आता ते आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये आपच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या आपच्या अजेंड्याला मोठा बळकटी मिळेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
अवध ओझा यांच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया देताना अरविंद केजरीवाल यांनी त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. “आपच्या शिक्षणविषयक धोरणांशी त्यांची विचारसरणी जुळते. त्यांच्या अनुभवामुळे आपल्या धोरणांना नवी दिशा मिळेल. त्यांनी आपच्या कार्यप्रेरणेने प्रेरित होऊन पक्षात प्रवेश केला आहे, याचा आम्हाला अभिमान आहे,” असे केजरीवाल म्हणाले.
केजरीवाल पुढे म्हणाले, “जेव्हा कोणी नेता आपमध्ये सामील होतो, तेव्हा आम्ही म्हणतो की त्यांनी पक्षाला बळ दिले. पण अवध ओझा यांच्या पक्षप्रवेशामुळे फक्त आपच नाही, तर शिक्षण क्षेत्रही अधिक सशक्त होईल. त्यांच्या योगदानामुळे शिक्षणासाठी आपले कार्य अधिक प्रभावी होईल.”
आपच्या आगामी निवडणूक तयारीच्या पार्श्वभूमीवर ओझा यांचा प्रवेश पक्षाच्या शैक्षणिक सुधारणा अजेंड्याला नवीन दिशा देण्याचे संकेत देतो.