2025 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने मंगळवारी 26 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. आपच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी काँग्रेसने जोरदार तयारी केली असून या यादीत काही महत्त्वाचे नावांचा समावेश आहे. जंगपूरा मतदारसंघातून आपचे दिग्गज नेते मनीष सिसोदिया यांच्या विरोधात फरहान सूरी यांना तिकीट देण्यात आले आहे. राजौरी गार्डनसाठी धर्मपाल चंदेला, तर दिल्ली कॅन्टोन्मेंटसाठी प्रदीप कुमार उपमन्यू काँग्रेसचे उमेदवार असतील.
यापूर्वी, 21 डिसेंबरला काँग्रेसने पहिली उमेदवार यादी जाहीर केली होती. या महत्त्वाच्या निवडणुकांसाठी काँग्रेस आपले उमेदवार निश्चित करण्याच्या प्रक्रियेत असून, गेल्या काही वर्षांपासून आपकडून होणाऱ्या तीव्र स्पर्धेला तोंड देण्यासाठी रणनीती आखत आहे.
दिल्ली काँग्रेसचा आपवर हल्लाबोल
दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांनी आपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली. ANI ला दिलेल्या मुलाखतीत यादव यांनी केजरीवाल यांच्या अपूर्ण आश्वासनांवर प्रश्न उपस्थित केले आणि त्यांच्या पात्रतेवरही शंका व्यक्त केली.
“माझा त्यांना सोपा प्रश्न आहे – ते (अरविंद केजरीवाल) मुख्यमंत्रिपदासाठी पात्र आहेत का? कोर्टाने त्यांना फाईलवर स्वाक्षरी करण्याची परवानगी दिली आहे का? त्यांनी दिलेली सर्व आश्वासने पूर्ण झाली आहेत का? ते फक्त घोषणा करतात, पण त्यांनी प्रत्यक्षात काय अंमलबजावणी केली आहे याचे उत्तर ते देऊ शकतात का?” यादव यांनी विचारले.
राजकीय उलथापालथ
दिल्लीतील वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर, विशेषतः दिल्ली दारू धोरण प्रकरणात अटकेनंतर, केजरीवाल यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. जुलैमध्ये सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर त्यांची तिहार जेलमधून सुटका झाली होती. मात्र, कोर्टाने त्यांना मुख्यमंत्री कार्यालयात जाण्यास आणि अधिकृत कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास मनाई केली.
ड्रामेटिक पद्धतीने केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा जाहीर केला आणि 2025 च्या निवडणुकीत जनतेने “प्रामाणिकतेचे प्रमाणपत्र” दिल्यासच पुन्हा पदावर परतण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या जागी आतिशी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली आहेत.