प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात शुक्रवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग सेक्टर 18 मधील शंकराचार्य मार्गावर लागल्याने भाविकांमध्ये घबराट पसरली.
आगीची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र, आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आग लागल्यानंतर संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरल्याचे दृश्य समोर आले आहे, त्यामुळे महाकुंभ मेळ्यातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ही घटना २९ जानेवारीला त्रिवेणी संगम येथे अमृत स्नानाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीनंतर घडली आहे. त्या दुर्घटनेत ३० जणांचा मृत्यू झाला होता, तर ६० जण जखमी झाले होते.
या महिन्यात महाकुंभ क्षेत्राजवळ आग लागण्याची ही तिसरी घटना आहे. १९ जानेवारी रोजी सेक्टर १९ मधील तुलसी मार्गावर दोन गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली होती. त्यानंतर २५ जानेवारी रोजी महाकुंभ परिसराजवळ पार्क केलेल्या दोन वाहनांना आग लागली होती.
अग्निशमन दलाने भाविकांना सुरक्षित स्थळी हलवले असून, प्रशासन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सतर्क आहे.